लिथियमनंतर आता भारतात सापडल्या सोन्याच्या खाणी, ‘हे’ ३ जिल्हे भरणार देशाची तिजोरी

Gold Mines Found in India: जम्मू-काश्मीरमध्ये भारताला लिथियमचा साठा मिळाल्यानंतर आता भारतासाठी आणखी एक मोठी बातमी आहे. देशातील 3 जिल्ह्यांमध्ये सोन्याचा साठा सापडला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने आपल्या सर्वेक्षणात ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये (Gold Reserves In Odisha) सोन्याचा साठा आढळून आला आहे. देवगड, केओंझार आणि मयूरभंज जिल्ह्यात हा साठा सापडला असल्याची माहिती ओडिशाचे खाण मंत्री प्रफुल्ल मलिक यांनी दिली आहे.

विधानसभेत आमदार सुधीर कुमार सामल यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री प्रफुल्ल मलिक म्हणाले की, भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण आणि खाण संचालनालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने त्यांच्या पाहणीत देवगडमध्ये सोन्याचे साठे शोधले आहेत. देवगड, केओंझर आणि मयूरभंज जिल्ह्यात हे सोन्याचे साठे आढळले आहेत.

सोन्याचा साठा कुठे सापडला?
विशेष म्हणजे हा सोन्याचा साठा मयूरभंजमध्ये चार ठिकाणी, देवगडमध्ये एक आणि केओंझरमध्ये चार ठिकाणी सापडला आहे. यामध्ये मयूरभंज जिल्ह्यातील सुरियागुडा, रुआनसिला, धुशुरा हिल आणि जोशीपुरा परिसराचा समावेश आहे. देवगडच्या आडस आणि केओंझारच्या डिमिरीमुंडा, कुष्कला, गोटीपूर आणि गोपूरमध्ये हे साठे सापडले आहे.

यासोबतच प्रफुल्ल मलिक यांनीही त्यांच्या उत्तरात म्हटले आहे की, १९७० आणि १९८० मध्ये या भागात जीएसआय सर्वेक्षण करण्यात आले होते, परंतु त्याचा निकाल जाहीर झाला नव्हता. मात्र गेल्या २ वर्षांपासून या तीन जिल्ह्यांमध्ये जीएसआय सातत्याने सर्वेक्षण करत होते. त्यानंतर या ठिकाणी सोन्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सोन्याचा किती मोठा साठा सापडला आहे आणि त्यात किती सोने आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यापूर्वी भारतात लिथियमचे साठे सापडले होते
यापूर्वी, देशात प्रथमच लिथियमचे साठे सापडले. हा साठा जम्मू काश्मीरमधील रियासीमध्ये सापडला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच जीएसआयनुसार हा साठा ५९ लाख टन इतका आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम मिळाल्यानंतर भारताला यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.  लिथियम हा पांढर्‍या रंगाचा धातू आहे, जो बहुतेकदा बॅटरी बनवण्यासाठी वापरला जातो.