रवींद्र धंगेकरांच्या बॅनर्सवर राष्ट्रवादी गायब; मविआत धुसफूस ? 

पुणे – कसबा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने एका बाजूला महायुती पूर्ण ताकतीने मैदानात उतरली असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत मात्र सुप्त संघर्ष सुरु आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे कसब्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धंगेकर यांना ताकद देण्याचा पुरेपूर प्रयत्न असताना काँग्रेसकडून मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना का डावलण्यात येतंय का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

याचे करण म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघात लागलेल्या एका प्रचार फलकावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब आहेत. या प्रचार फलकावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विश्वजीत कदम, ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, आरपीआय गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांचे फोटो आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा फोटो या फलकावर नसल्याने महाविकास आघाडीत आता धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे.

मटाच्या वृत्तानुसार, या फलकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव जरी असलं तरी राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांपैकी कोणाचाही फोटो नाहीये. शरद पवार, जयंत पाटील किंवा अजित पवार यांचा कोणाचाही फोटो नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. स्वतः प्रशांत जगताप यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून कसब्यामध्ये त्यांनी प्रचाराचा अक्षरशः धडाका लावला आहे. ठिकठिकाणी त्यांच्या सभाही सुरू झाल्या आहेत. मात्र अशात आता प्रचार सभेत लावलेल्या बॅनर्सवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो गायब असल्याने महाविकास आघाडीत एकी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.