महावितरणमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती पत्रे देण्यास वेग

पुणे : महावितरणच्या (Mahavitran) मृत कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती (Appointment on compassionate basis) देण्यासाठी पुणे परिमंडलामध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करीत सहा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे तर आणखी सहा जणांना या महिन्याअखेर सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्‍यांच्या रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. पुणे परिमंडलामध्ये गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या १५ कायदेशीर वारसदारांकडून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अर्ज प्राप्त झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्रांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहे. त्यानुसार मानव संसाधन विभागाकडून या सर्व वारसांकडून अर्ज भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आदींच्या कार्यवाहीला गती देण्यात आली.

विशेष म्हणजे सर्वच १५ वारसदारांच्या नियुक्तीबाबत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांची प्रतीक्षायादी तयार करण्यात आली. यामध्ये वर्ग तीनमध्ये निम्न स्तर लिपिक म्हणून सहा जणांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व सौ. माधुरी राऊत (लेखा व वित्त), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रेय साळी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्य अभियंता  पवार यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, महावितरण ही सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, सकारात्मकतेने सेवा देण्याची जबाबदारी व कर्तव्य बजवावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले. तसेच पुणे परिमंडल अंतर्गत सर्व विभाग कार्यालयांनी अनुकंपा तत्त्वानुसार वारसांना नोकरी देण्याची कार्यवाही अधिक वेगवान करावी. अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास स्वतः पुढाकार घेऊन त्याची पूर्तता करावी असे निर्देश त्यांनी दिले.

जानेवारीअखेर पुणे परिमंडलातील वर्ग चारचे सहा पदे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहे. या रिक्त जागी अनुकंपा तत्त्वावरील उर्वरित ९ पैकी सहा जणांना येत्या पंधरवड्यात नियुक्तिपत्र देण्यात येईल. तसेच उर्वरित आणखी तीन जणांसाठी सध्या पदे रिक्त नसल्याने त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार इतर परिमंडलामध्ये रिक्त जागी नियुक्ती पत्र देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे.