पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; कार्यालयाची तोडफोड

जशास तसे उत्तर देत भाजपने बदला घेतला ?

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यास १५ ते २० जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. आप्पा जाधव(Appa Jadhav)  असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भाजपच्या माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह 15 ते 20 जणांनी मिळून हा हल्ला केला असल्याचा आरोप केला जात आहे.

अप्पा जाधव यांचे नारायण पेठेत हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळेत जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी भाजपच्या माथाडी सेलचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे (santosh kambale) हे त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आले. त्याने जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच मारहाण केली.

कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोडही केली. त्यानंतर सर्वजण दुचाकीवरुन पसार झाले. जाधव यांना मारहाणीत दुखापत झाली आहे. याप्रकरणी आप्पा जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (vishram baug police thane)कांबळे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे त्या परिसरात काहीकाळ तणाव देखील निर्माण झाला होता. या घटनेमुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे.