अमृता फडणविसांवर टीका करताना राष्ट्रवादीचा नेता बरळला; म्हणाला, ही डान्सबारमधली …

नवी मुंबई – नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना आपल्या भाषणात त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. विशेष म्हणजे या वाचाळवीर नेत्याला आपण महिलांचा कायम सन्मान करण्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या नावाने असणाऱ्या चौकात भाषण करत आहोत याचे देखील भान राहिले नसल्याचे दिसत आहे.

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते”, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, गावडे यांनी हे आक्षेपार्ह विधान केल्याने नवी मुंबई भाजपकडून अशोक गावडे यांचा निषेध केला जात आहे; तर त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून व्यक्त केली जात आहे. गावडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे निषेध केला आहे.

महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सागितले पाहिजे असं म्हणत म्हात्रे यांनी हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी की करू नये हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही उद्या त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करणार आहोत आणि त्यांना नवी मुंबईतही फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे.