जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच अध्यक्ष झाला पाहिजे – भुजबळ

नाशिक – पक्षबांधणी कार्यक्रम ग्रामीण आणि शहर भागात नेटाने सुरू ठेवायला हवा निवडणुका काही महिने पुढे ढकलल्या आहेत मात्र आपली तयारी १०० टक्के असायला हवी आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय आपण कोणतीही निवडणूक घेणार नाही आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहोत, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न  आणि इतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी  प्रयत्न करणार आहे. असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (State Food, Civil Supplies Consumer Protection Minister Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. नाशिक मधील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण आणि शहर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते..

यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व ६ आमदारांनी जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे नवीन जुने अश्या सर्वांना एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, याना एकत्र घेऊन आपण काम केले पाहिजे. पक्षबांधणीचे जो योग्य काम करेल त्याला पक्ष योग्य ती संधी देईल . यावेळी नाशिक महानगरपालिकेतील आघाडी करायची की नाही याचा निर्णय योग्य वेळी होईल आपण मात्र प्रत्येक वार्ड मध्ये पक्ष मजबूत करायला हवा एकमेकांमधले वाद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे. तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे सर्वोतोपरी प्रयत्न महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून आपण करू.

लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) आपले प्रश्न सोडवते असा विश्वास लोकांना वाटायला हवा असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले की पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून आगामी निवडणुकीत भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करा काही मंडळी विनाकारण दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करून विकासकामांवर लक्ष द्यायला हवे. महानगरपालिका ज्यांच्या हातात होती त्यांनी नेमका कसा कारभार केला हे सर्व जनतेला ठाऊक आहे. सत्तेतून भ्रष्टाचार, भ्रष्टाचारामधून पैसा आणि तोच पैसा वापरून निवडणुका लढविल्या जातील मात्र आपण विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे जाऊया. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक येथील विविध पदाधिकारी यांनी आपले प्रश्न आणि मते व्यक्त केली