‘राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत, त्यामुळे आपला पक्ष अधिक बळकट होईल’

पनवेल – कोणत्याही निवडणुकीत यश मिळवण्याचे रहस्य हे बुथ कमिट्यांमध्ये आहे. आपला बुथवर कार्यकर्ता असेल तर अर्ध्या गोष्टी सोप्या होतात. बुथवर कार्यकर्ते प्रचार करू लागले तर मोठयाप्रमाणात परिवर्तन करता येते. आज महागाई इतकी वाढली आहे की ती महागाई लोकांमध्ये जाऊन सांगा आणि भाजपची पोलखोल करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil)  यांनी पनवेल (panvel)  येथे केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या (Rashtrvadi parivar sanwad yatra) निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज संवाद साधला. आपले राज्य हे फुले – शाहू – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे राज्य आहे. हे विचार टिकवण्यासाठी आपण पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा या पनवेल विधानसभा मतदारसंघावर पुरोगामी विचारांचा झेंडा फडकवू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पनवेलमध्ये आपण लोकसभा लढवायचो नाही, विधानसभा लढवायचो नाही मात्र तरीही पनवेल येथे कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खुप मोठा वेळ दिला. यश – अपयश ही दुसरी गोष्ट असली तरी पार्थ पवार यांच्या निवडणुकीत आपण प्रचंड ताकदीने लढलो आणि चांगली मते मिळवली. आपली पवारसाहेबांवर निष्ठा होती म्हणूनच आपण ते केले असेही जयंत पाटील म्हणाले.

कार्यकर्ते सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी लढत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी झटत आहे. त्यामुळे आपला पक्ष अधिक बळकट होईल, लोक पक्षाकडे आकर्षित होतील असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले. येत्या काळात पनवेल महानगरपालिका निवडणूक होईल. सुनिल तटकरेसाहेबांनी स्वतः आश्वासन दिले आहे की, इथल्या समस्यांमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत आणि तटकरेसाहेबांनी ही जबाबदारी पूर्ण केली तर आपल्याला यश सहज मिळेल असा विश्वासही व्यक्त केला.

पक्ष संघटनेच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्यानिमित्ताने हाती घेतला आहे. राज्यभर दौरा केल्यानंतर आज ते रायगड येथे आले आहेत. पनवेल शहरात आपल्याला चांगल्या कार्यकर्त्यांचा संच उभा करायचा आहे असे खासदार सुनिल तटकरे आपल्या भाषणात म्हणाले. आज आपल्याकडे सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सोडवत आहोत आणि पक्षाचे कार्यकर्ते वाढवत आहोत. पनवेल येथील प्रत्येक भागात फिरण्याचा आमचा प्रयत्न असतो. संघटनेच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न असतो. ही भूमिका घेतली तर या पनवेलमध्येही आपण परिवर्तन नक्की घडवू शकतो असा विश्वास खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare)  यांनी यावेळी दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, मच्छिमार नेते चंदू पाटील प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, पनवेल ग्रामीण तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, पनवेल युवक कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.