राजकारणात काम करणाऱ्या महिलांना विशेष सुरक्षा मिळाली पाहिजे – नीलम गोऱ्हे

 Pune – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काल (16 जून) ठाणेनजीक कळव्यात एका कार्यक्रमात अचानक काही स्थानिक महिलांनी हल्ला चढवत त्यांना मारहाण केली.  तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला आहे असं म्हणत काही महिलांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेतली आहे.याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘राजकारणात काम करणाऱ्या सर्वच महिलांना सन्मान आणि सुरक्षा मिळाली पाहिजे. समाजात, राजकरणात महिलांचे प्रतिनिधित्व एका बाजूला वाढत असताना अशा प्रकारच्या घटना होणे हे अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात काम करणाऱ्या महिलांना विशेष सुरक्षा मिळाली पाहिजे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याची तक्रार पोलिसांनी घेतली पाहिजे, यातील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,’ असे त्यांनी म्हटले आहे.