गंगाखेड : श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

गंगाखेड / विनायक आंधळे :- नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दिप तेवत ठेवणारे एक थोर समाजसुधारक श्री संत शिरोमणी सेना महाराज (Shri Sant Shiromani Sena Maharaj) यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी पोटात कालवाकालव होते. सेनाजी, सेना महाराज तसेच सेनापती, सैन अशी त्यांची नावे आढळतात. उभे आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांनी अभंगवाणीतुन समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती.

संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव (Sant Dyaneshwar, Sant Namdev) यांच्या काळातील ते एक थोर भगवद्‌भक्त होते. समाजसेवा, राष्ट्रसेवा, अंभग, किर्तन ते करीत असत. हे कार्य करीत असतांना त्यांनी कधीच आपला व्यवसाय सोडला नाही. लोकांचे केस कापत असतांना ते स्वच्छता, समता व बंधुत्वता आणि एकतेसाठी प्रबोधन करत असत. लोकांचे ते अंतरअंगच नव्हे तर बाह्यअंग देखिल निर्मळ करीत असत. मानवालाच देव माना, माणसाला माणूस जोडा, संघटीत रहा असे संदेश त्यांनी अवघ्या विश्वाला दिलेला आहे.

याच श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची सार्वजनिक पुण्यतिथी कार्यक्रम 24 ऑगस्ट 2022, बुधवार रोजी गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिर (Sant Janabai Temple,Gangakhed) येथे संपन्न झाला. ह.भ.प. बाळासाहेब महाराज कतारे डोंगर पिंपळेकर यांचे कीर्तन झाले. त्यांना भजनी मंडळीनीं उत्तम साथ दिली.

सर्व संत महांतांनी नेहमीच सर्व समावेशक व सर्व धर्म समभाव टिकवून ठेवण्याचा व सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा कानमंत्र दिलेला आहे परंतु आजच्या जगात माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी कुठल्याही थराला जाण्याच्या तयारीत आहे म्हणूनच संतांची उपदेश हे आजच्या पिढीला लागू पडतात व त्याची गरज आहे असे प्रतिपादन ह.भ.प. बाळासाहेब महाराज यांनी केले.

यावेळी, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा. बाळकाका चौधरी, सुभाष डमरे, सुशांत चौधरी, साहेबराव चौधरी, नागेश डमरे, नरहरी डमरे, भिमा नेजे, गोविंद डमरे तसेच महिलावर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित होता. अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर गोरे, अॅड. बाळासाहेब डमरे, अतुल सुरवसे, नामदेव डमरे, माधव डमरे, किशन डमरे, संतोष पारेकर, गोविंद डमरे, स्वप्नील गिराम व खडकपूरा गल्लीतील रहिवाश्यांनी परिश्रम घेतले.