‘धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला’

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत.

जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे.भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत देखील पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली होती. या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने बाजी मारली.

दरम्यान, आता या विजयानंतर भाजपनेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते असं राणे यांनी म्हटले आहे.