“संजय राऊत महाविकास आघाडीची गौतमी पाटील”, नितेश राणे यांची जोरदार टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे नेहमी एकमेकांवर हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा हे दोन नेते आमने सामने आले आहेत. नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याशी तुलना केली आहे.

नितेश राणेंनी संजय राऊत महाविकासआघाडीचे गौतमी राऊत असल्याचं म्हणत टीका केली. तसेच राऊतांना ते नेमके कुणाच्या बाजूने आहेत हेही माहिती नाही. त्यामुळे त सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलतात, असा हल्लाबोल केला. ते शनिवारी (२७ मे) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सरड्यालाही लाज वाटेल एवढ्यावेळा ते रंग बदलत आहेत. महाविकासआघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत आहेत.”

“गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते. ती उत्तम कलाकार आहे आणि लोकप्रियही असेल. तिला पाहायला लोकांना आवडतं. तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला वाटतं की, लोकांना त्याला पाहायला आवडतं. तो गैरसमज दूर झाला पाहिजे,” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“मी गौतमी पाटीलला विनंती करेल की, तिने तिचं मेकअपचं काही सामान असेल तर ते संजय राऊतांकडे पाठवावं. गौतमीने राऊतांचं थोबाड थोडं चांगलं करावं. रोज सकाळी येऊन नशेत असल्यासारखं बोलत असतात. लोकांची सकाळ खराब करतात. ते इतरांची सुपारी घेऊन आग लावण्याचं,काड्या करण्याचं काम करतात,” असा आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला.