पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने ठोकला दावा; कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली 

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.मात्र दुसऱ्या बाजूला हि जागा कुणी लढवायची यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे.  हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा ‘अधिकृतपणे’ दावा सांगितला आहे.

लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नाही, असं वाटतं होतं. पण मला माहिती मिळाली की, पोटनिवडणूक लागणार आहे. यात आता ज्या पक्षाची ताकद असेल त्याला ती जागा मिळावी, असंही अजित पवार म्हणाले. पुण्यात टिंबर मार्केटमधील पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.

यावर पत्रकारांनी या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे का? असा सवाल विचारला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, हो, आम्ही पुण्याची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहोत. आज राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमची ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे १० नगरसेवक होते. जरी चेतन तुपेचा हडपसर मतदारसंघ शिरुरमध्ये येत असला तरी सुनील टिंगरेचा आमच्याकडे येतो. शहरात दोन आमदार आहेत. खाजगीमध्ये रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पण विचारा. त्याला निवडून आणण्याकरिता सगळ्या आघाडीच्या पक्षांनी सहकार्य केलं.

आता माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे जी निवडणूक लागेल तिथं ज्या आमच्या मित्र पक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं? वजन करायचं का? तर नाही. तर मागे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घ्यायची. विधानसभा निवडणुकांची माहिती घ्यायची. साधारण कोणाला किती मत पडली, अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. पत्रकारांना विचारायचं की काय साधारण काय इथं परिस्थिती आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. काँग्रेसने आपणच ही जागा लढणार असल्याचा दावा केला, यावर अजित पवार यांना विचारले असता, तो त्यांचा अधिकार आहे, आमच्या मित्र पक्षाला माझ्या शुभेच्छा, असं त्यांनी सांगितले.लेट्स अपने याबाबत वृत्त दिले आहे.