नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, दहा दिवसात शरण येण्याचे आदेश

नवी दिल्ली – शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी (santosh parab) भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांना सर्वोच्च न्यायालयातही (suprem court) दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.  कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनसाठी अर्ज करु शकतात.

नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या समोर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीनं मुकूल रोहतगी तर राज्य सरकारच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कोर्टात दोन्ही बाजूनं जोरादर युक्तिवाद करण्यात आला.

काय आहे प्रकरण?शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.