‘नवाब मलिक मुस्लीम असल्याने ते टिपू सुलतानाचं कौतुक करणारच, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?’

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून संघर्षाला सुरुवात झाली आहे. मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे केले आहे. मात्र टिपू सुलतानच्या मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे. टिपू सुलतानच्या नावाने शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केली आहे. नवाब मलिक मुस्लीम असल्याने ते टिपू सुलतानाचं (Tipu Sultan) कौतुक करणारच. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टे आहेत, हिंदू द्वेष हा त्यांच्या रक्तात आणि नसानसांत भरलाय, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करणाऱ्या टिपू सुलतानाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. टिपू सुलतानाने फक्त हिंदूच नव्हे तर ख्रिश्चनांवरही अत्याचार केले. त्यांचे चर्चा उद्ध्वस्त केले. बिगरमुस्लिम असणाऱ्या प्रत्येकावर टिपू सुलतानाने अत्याचार केले असे दरेकर म्हणाले.