गृहमंत्रीपदासाठी फडणवीस नाही, तर ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

नवी दिल्ली- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी उशिरा दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी शहा यांच्याशी राज्यातील मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत पोहोचले. यादरम्यान ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत.

शुक्रवारी राजधानीत पोहोचल्यानंतर दोन्ही नेते महाराष्ट्र सदनात पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. काही वेळाने शिंदे तेथे गेले. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील सत्तावाटपाच्या सूत्राभोवती अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे मानले जाते.दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्तारानं चर्चा झाली. राज्याचे नवे गृहमंत्रीपद कुणाला मिळणार यावर देखील या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच होते. आता हे खातं फडणवीसांना न मिळता चंद्रकांत पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची नियुक्ती होऊ शकते. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा ओबीसी चेहरा पुढे करेल’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.