“फक्त कामापुरती मैत्री न ठेवता…”, नितीन देसाईंच्या ‘त्या’ निर्णयानंतर मराठी लेखकाची लक्षवेधी पोस्ट

Nitin Desai Suicide : आज सिने जगतामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये वयाच्या केवळ ५८ व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. त्यांनी अचानक हे टोकाचं पाऊल उचलल्याने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठीतील लोकप्रिय लेखक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) याने नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत क्षितीजने नितीन देसाईंच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. “परिस्थितीच्या रेट्यामुळे एकटी पडलेली अनेक माणसं आपल्याही आसपास असतात. गरज आहे ते आपण त्यांच्यासाठी आहेत हे सांगायची. त्यांच्या कठीण प्रसंगात उभं राहायची. फक्त कामापुरती मैत्री न ठेवता कामाव्यतिरिक्त विचारपूस करायची. सरतेशेवटी आपली या जगात कोणालातरी काळजी आहे, ही एक भावनासुद्धा माणसाला तग धरायला पुरेशी असते. ती काळजी आपण करायला हवी आणि कधीकधी स्वत:हून दाखवायला हवी,” असं क्षितीजने पोस्टमध्ये म्हटलं आहे.