भारताने वेस्ट इंडिजला २०० धावांच्या अंतराने केले पराभूत, सलग तेरावी वनडे मालिका जिंकत केला विक्रम

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांनी (IND vs WI) पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग 13वी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने एकाच संघाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. या बाबतीत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 वनडे मालिका जिंकली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 विकेट गमावत 351 धावा केल्या होत्या. भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 35.3 षटकात 151 धावांवर गारद झाला आणि 200 धावांनी पराभूत झाला. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 224 धावांनी पराभव केला होता.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच विकेट्सवर 351 धावांची मोठी धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिजमध्ये विंडीजविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2009 मध्ये भारताने किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 6 बाद 339 धावा केल्या होत्या. भारतीय संघाच्या डावात इशानशिवाय शुभमन गिल (85) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (नाबाद 70) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताने प्रथमच एकदिवसीय सामन्यात एकाही फलंदाजाने शतक न करता 350 हून अधिक धावा केल्या. याआधी भारताने 2005 मध्ये नागपुरात श्रीलंकेविरुद्ध 6 बाद 350 धावा केल्या होत्या.