‘गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे’

नागपूर – आम्ही मंत्री असल्याने गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार असल्याचं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’च्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘ब्लॉसम’ (Blossom) नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याचं उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रात 1995 मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसं करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे 2 हजार मुलांचा मृत्यू झाला. तेथील 450 गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितलं, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला.

वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला. गरीबाचं कल्याण करण्यासाठी कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,असंही नितीन गडकरींनी म्हटलं.