निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली – निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivritti Maharaj Indurikar) हे कीर्तनकार गावा खेड्यात फेमस आहेत. व्यंगात्मक शैलीतून प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज सध्या अडचणीत आलेत. त्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेलं एक विधान. याच प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळून लावलीये. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांविरोधात कलम 22 अंतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सम तारखेला आणि विषम तारखेला संबंध ठेवले तर मुलगा वा मुलगी होते असे विधान इंदुरीकर महाराजांनी केले होते आणि त्यानंतर त्यांच्याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आधी या प्रकरणामध्ये इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर प्रथम वर्ग कोर्टाने खटला चालवायचे आदेश दिले होते. याविरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा कोर्टात खटला चालवू नये यासाठी याचिका केली होती. जिल्हा कोर्टाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. मात्र त्यानंतर याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने सुद्धा इंदुरीकर महाराजांच्या विरोधात खटला चालवावा असा निकाल दिला.

याविरोधात इंदुरीकर महाराज सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळं इंदुरीकर महाराज सुप्रीम कोर्टात गेले होते. मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आता इंदोरीकर यांच्यावर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांचं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप त्याच्यावर झाला. याचसंदर्भात आता कायदेशीर मार्गाने खटला चालवला जाणार आहे.