भोसरीच्या पैलवानाने गोव्याचे मैदान मारले ; जोशुआ डिसोझा यांचा दमदार विजय !

पिंपरी : गोवा विधानसभा निवडणुकीत म्हापसा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी दमदार विजय मिळवला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडे म्हापसा मतदार संघ निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे राजकीय पटलावरील पैलवान अशी ओळख असलेल्या आमदार लांडगे गोव्याचे मैदान मारले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, ३ राज्यांमध्ये भाजपाने आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपा सध्या १७ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे म्हापसा विधानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसुझा यांचे पुत्र जोशुआ डिसुझा हे निवडणूक लढवत होते. आता या जागेवरून जोशुआ निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये जोशुआ १७२५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपमधून काँग्रेसवासी झालेले सुधीर कांदोळकर हे निवडणूक लढवत होते. तर, जोशुआ यांनी घेतलेली ही आघाडी पाहता हे कल आता शेवटपर्यंत राहून जोशुआ डिसुझा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील जोशुआ यांनी बाजी मारली होती. जोशुआ डिसुझा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले होते. जोशुआ हे अत्यंत तरुण असे नेते आहेत. जोशुआ यांचे वय अवघे ३३ वर्षे आहे. विशेष म्हणजे, भाजपातून बंडखोरी केलेले मंत्री मायकेल लोबो यांनी या मतदार संघात विशेष लक्ष घातले होते. यापार्श्वभूमीवर गोवा भाजपा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हापसा मतदार संघाची जबाबदारी आमदार लांडगे यांच्यावर सोपवली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत जोशुआ यांनी बाजी मारली.