तुम्ही खरे की उद्धव ठाकरे? जुन्या ट्विटवरुन भाजपचा आदित्य ठाकरेंना खोचक सवाल

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे. नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे असं ठाकरे यांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र मुख्यमंत्री आणि सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचं जुनं ट्विट शेअर करत प्रश्न केला आहे.

उपाध्ये यांनी भाजपा-शिवसेना सत्तेत असताना आदित्य ठाकरेंनी केलेलं ट्विट शेअर केलं आहे. 8 मार्च 2019 म्हणजेच विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे टविट असून त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची वचनपूर्ती.. असे म्हणत 500 फूटापर्यंतच्या करमाफीसंबंधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. त्यावरुन, नेमके खरे कोणय़? तुम्ही की उद्धव ठाकरे? कारण दोन वर्षांपूर्वीच तुम्ही आभार मानले होते, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.