अरेरे! यांच्या डोक्यात द्वेष किती ठासून भरलाय… हेमंत देसाई यांचा अनिल बोंडे यांच्यावर हल्लाबोल

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. दरम्यान, काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून या प्रकरणावर भाजपाचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचे शेवटचे वाईट दिवस सुरू झाले आहे. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, शरद पवारांचे शेवटचे दिवस वाईट सुरू झाले आहे. फ्रान्सच्या राजाला जनतेने भर चौकात फाशी दिली होती. त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती महाराष्ट्रमध्ये होत आहे. राज्यात माझीच सुरक्षा नाही तर जनतेच काय? त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी असं शरद पवार यांनी जाहीर केले पाहिजे, असं त्यांनी सुचवलं आहे.

दरम्यान, यावर आता जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजपचे थोर नेते व माजी मंत्री अनिल बोंडे म्हणाले की, ‘शरद पवार यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. फ्रान्समध्ये शेवटी राजाला फासावर जावे लागले होते….!’ अरेरे! यांच्या डोक्यात द्वेष किती ठासून भरलाय… ‘गोली मारो सालोंको’ असे म्हणणारे दिल्लीचे अनुरागी मंत्रिमहोदय आणि विदर्भातील हे महान नेते यांच्यात असा काय फरक आहे? यापूर्वी नाना पटोले यांची बोटे छाटली छाटण्याची भाषाही या ‘संस्कारी’ नेत्याने केली होती. देवेंद्रजी, तुम्हाला हे वक्तव्य मंजूर आहे का? अन्यथा, बोंडेंचा जाहीरपणे निषेध करा आणि त्यांना कडक समज द्या! असं देसाई यांनी म्हटले आहे.