संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही; आदित्य ठाकरेंनी फक्त एकाच वाक्यात मनसेचा विषय संपवला 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले चढवले जात आहेत. नुकताच पार पडलेला मनसेचा मेळावा हा राज्यभरात चर्चेचा विषय बनला असून राज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी केलेल्या ठाकरी शैलीतील भाषणाची अजूनही चर्चा होताना दिसत आहे.

राज यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार केला तसेच मशिदी आणि त्यावर असणाऱ्या अनधिकृत भोंग्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचे अजूनही पडसाद उमटत आहेत. दुसऱ्या बाजूला राज यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेवर सेनेच्या नेत्यांना नेमके काय बोलावे हेच समजत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेला डिवचले आहे. ते म्हणाले, संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही. भगवान श्रीराम हे आमच्या मनात आहेत, म्हणत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अवघ्या एका वाक्यात महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेचा विषय संपवला. आदित्य यांनी आज परळ येथील डिलाइल ब्रिजच्या कामाची पाहणी करण्यासाठी हजेरी लावली.यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे पक्ष म्हणून संपला की नाही हे जनता ठरवेल, पण शिवसेनेचे हिंदुत्व संपले आहे. आम्ही सेना भवनसमोर हनुमान चालीसा म्हणून यांना राग का येतो, असा सवाल त्यांनी केला. आदित्य ठाकरेंनी आमच्या पक्षाबाबत बोलू नये. शिवसेना ही मुस्लिम लीग सेना झाली आहे का, शिवसेना स्वतःला हिंदू म्हणते मग हनुमान चालीसा आम्हाला का लावू देत नाही, असा सवालही त्यांनी केला.