अखेर ठरलं! निवडणूक हरल्यानंतरही उत्तराखंडमध्ये भाजपकडून पुष्कर सिंह धामींना संधी

नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीनं काल उत्तराखंड आणि गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नावं जाहीर केली. पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तर डॉ प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरा दिवसांनी दोन्ही राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या विधीमंडळ पक्षानं कालच आपल्या गटनेत्यांची निवड केली.

पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी काल भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. तत्पूर्वी राज्यपाल गुरमीत सिंग यांनी राजभवनात हंगामी सभापती बनशीधर भगत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर भगत यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. 70 सदस्यांच्या विधानसभेत 47 जागा जिंकत उत्तराखंड राज्यात भाजपने पुन्हा एकदा सत्तेत प्रवेश केला आहे. धामी यांनी उत्तराखंडमध्ये काल राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल गुरमीत सिंग यांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत पत्र दिलं. उद्या 23 मार्च ला धामी यांचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोव्यात काल संध्याकाळी पणजीमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत सावंत यांच्या नावाची घोषणा करताना डॉक्टर सावंत पुढची 5 वर्ष गोव्याचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास देखील व्यक्त केला. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत निवडून आलेल्या भाजपच्या 20 सदस्यांना, 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 सदस्यांचा पाठिंबा आहे.