‘जनतेने मला स्वीकारले याचा आनंद आहे; गोव्याच्या विकासासाठी जे काही शक्य आहे ते मी करेन’

पणजी – भारतीय जनता पार्टीनं काल उत्तराखंड आणि गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नावं जाहीर केली. पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी तर डॉ प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरा दिवसांनी दोन्ही राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या विधीमंडळ पक्षानं कालच आपल्या गटनेत्यांची निवड केली.

दरम्यान, गोव्यात मागील काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु होती. पण आता विश्वजित राणे यांची नाराजी दूर करत भाजपने प्रमोद सावंत यांची विधीमंडळ नेता म्हणून एकमताने निवड केली आहे.

प्रमोद सावंत म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, ज्यांनी मला पुढील पाच वर्षांसाठी गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. गोव्यातील जनतेने मला स्वीकारले याचा मला आनंद आहे. गोव्याच्या विकासासाठी जे काही शक्य आहे ते मी करेन.’ असं ते म्हणाले.