शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो लढवणार निवडणूक 

कोलकाता –  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना बालीगंगे  विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूलचे उमेदवार घोषित केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी ट्विट केले की माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आसनसोल मधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तृणमूलचे उमेदवार असतील आणि बाबुल सुप्रियो हे बालीगंगेच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तृणमूलचे उमेदवार असतील.

TMC प्रमुखांनी ट्विट केले की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदवार असतील हे जाहीर करताना आनंद होत आहे. ममता बॅनर्जी यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की,  माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो बॉलीगंगे विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील. जय हिंद, जय बांगला, जय माँ माती मानुष.

आसनसोल लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार राहिलेले सुप्रियो यांनी गेल्या वर्षी पक्ष सोडला आणि टीएमसीमध्ये प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली. त्याचवेळी राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनाने बालीगंगे विधानसभा जागा रिक्त झाली होती.