पुण्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

पुणे : महाराष्ट्रातील आदिवासी रूढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसिद्धीसाठी आदिवासी  विकास विभागांतर्गत येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने २३ ते २७ मार्च या कालावधीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, क्विन्स गार्डन, व्हीव्हीआयपी विश्रामगृह परिसर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे उद्धाटन २३ मार्चला सायंकाळी ४ वाजता आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंघल उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवामध्ये आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा तसेच लघूपट महोत्सवाचा समावेश आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गवताच्या वस्तू, वेतकाम, बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातुकाम, मातीकाम, वनौषधी व लाकडी लगद्याचे मुखवटे महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.

महोत्सवात सकाळी १०  ते रात्री ८ वाजेपर्यंत आदिवासी  हस्तकलांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून प्रदर्शित आदिवासी जीवन, कला व संस्कृतीवर आधारित आदिवासी लघूपट महोत्सवाचेही २५ व २६ मार्च रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.