केंद्रीय अर्थसंकल्पावर रोहित पवारांची टीका; अजितदादांचे कौतुक करत म्हणाले…

Budget 2023 India Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2023-2024 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget 2023) सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा पाचवा अर्थसंकल्प होता. पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प होता. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा करत सर्वसामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, व्यावसायिक यासह अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आता हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यावर प्रतिक्रिया देत असून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी? याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी (Ajit Pawar) दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही सप्तर्षी वापरताना घेतला असावा, पण अजितदादांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत.

केवळ करपात्र उत्पन्नात सवलत व भांडवली खर्चात वाढ याच जमेच्या बाजू दिसतात. परंतु गत सात वर्षांप्रमाणे केवळ तरतूद करून चालणार नाही तर प्रत्यक्ष भांडवली खर्चही करायला हवा तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. करसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढण्याठीही प्रयत्न करण्याची गरज होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. पुढच्या वर्षी निवडणुका असूनही यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीप्रमाणे लोकप्रिय घोषणा झाल्या नाहीत, याचाच अर्थ सरकारला देशाच्या आर्थिक वास्तवाची जाण झालेली दिसते, असं त्यांनी म्हटले आहे.