जावयामुळे अडचणीत आलेल्या मनोहर जोशींचा राजीमाना बाळासाहेबांनी घेतला होता, आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ?

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.

या प्रकरणामुळे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याच्या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. मनोहर जोशी हे त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यामुळे चांगलेत अडचणीत आले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 1998 मध्ये त्यांनी पुण्यातील शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलून ते जावई गिरीश व्यास यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचं स्पष्ट झालं. जिथं त्यांनी दहा मजल्यांची इमारत बांधली.

हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जोशींवर ताशेरे ओढले. जोशींसारख्या उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यानं फक्त जावयाच्या फायद्यासाठी एखाद्या शाळेच्या जागेचं आरक्षण बदलणं संतापजन असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले होते. या प्रकरणात अडचणी वाढल्यानंतर तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना त्यांच्या जागी मुख्यमंत्री केलं होतं.

दरम्यान, श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. त्यामुळे आता बाळासाहेबांनी त्यावेळी घेतलेली भूमिका पाहता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे काय भूमिका राजीनामा घेणार की पक्षप्रमुखांना वेगळा नियम आणि शिवसैनिकाला वेगळा नियम असं होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.