Babar Azam | विजयाच्या नजीक पोहोचूनही पाकिस्तानने गमावला हाय व्होल्टेज सामना, कर्णधार आझमने सांगितली कुठे झाली चूक?

Babar Azam | टी20 विश्वचषक 2024 मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. चालू स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या वेदना व्यक्त झाल्या. त्याने सांगितले की, सतत विकेट गमावल्यामुळे त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

बुमराहच्या घातक गोलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 19 षटकात 10 गडी गमावून 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर पाकिस्तानचे महान फलंदाज फ्लॉप ठरले. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 14 धावा देत 3 विकेट्स काढल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

पराभवानंतर बाबर आझमने व्यक्त केल्या भावना
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) आपल्या संघाची कुठे चूक झाली हे सांगितले. तो म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण फलंदाजी करताना आम्ही विकेट गमावत राहिलो आणि बरेच डॉट बॉल्सही खेळलो. आमची रणनिती निश्चित होती, सामान्य खेळ खेळायचा, फक्त स्ट्राइक रोटेशन आणि काही चौकार मारायचे. पण त्या काळात आम्ही खूप डॉट बॉल्स खेळलो. खालच्या फळीतील फलंदाजांकडून आम्ही फार काही अपेक्षा करू शकत नव्हतो.”

बाबर पुढे म्हणाला, “आमच्या डोक्यात फलंदाजी करताना पहिल्या सहा षटकांचा कसा योग्य वापर करायचा हे चालू होते. पण एक विकेट पडल्यानंतर पुन्हा आम्ही पहिल्या सहा षटकांत चांगली कामगिरी केली नाही. खेळपट्टी चांगली दिसत होती. चेंडूही चांगला येत होता. काही चेंडू संथ पडत होते तर काही उसळी घेऊन बॅटवर येत होते. पण आम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही,” हे बाबरने मान्य केले,

विश्वचषक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्हाला शेवटचे दोन सामने जिंकायचे आहेत, आम्ही शेवटच्या दोन सामन्यांची वाट पाहत आहोत, असेही बाबरने म्हटले.

सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या विजयासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांचे चार गुण आहेत. त्याचबरोबर भारताचा नेट रन रेटही 1.455 झाला आहे. याशिवाय चालू स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर आझमच्या संघाला अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडता आलेले नाही. सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. 11 जून रोजी बाबर आझमचा संघ कॅनडाशी भिडणार आहे, तर 16 जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकातील 36 वा सामना खेळायचा आहे. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!