राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छता पुरस्कार विजेत्या विटा, लोणावळा, सासवड, नवी मुंबई वासियांचं अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :- राष्ट्रीय पातळीवरच्या स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्रानं सर्वाधिक पुरस्कार जिंकून देशात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून सांगली जिल्ह्यातील विटा, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवड नगरपालिकांनी अनुक्रमे पहिले तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकांचं विशेष अभिनंदन केले आहे. नवी मुंबई महापालिकेनं विशेष पुरस्कार जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही कौतुक केले आहे. ‘स्वच्छेतेतून आरोग्याकडे, आरोग्यातून विकासाकडे’ सुरु असलेली राज्याची वाटचाली अशीच सुरु राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयातर्फे स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना आज राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते स्वच्छता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. गौरवण्यात आलेल्या पुरस्कार विजेत्यांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रानं स्वच्छता अभियानात सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी केली आहे. या यशात राज्यातल्या संत-महात्म्यांनी केलेल्या प्रबोधनाचं तसंच माजी ग्रामविकासमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानाचं मोठं योगदान आहे. आज पुरस्कार मिळालेल्या नगरपालिका आणि शहरांच्या यशात संबंधित स्थानिक स्वराज संस्थांतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता अभियानात सहभागी, सहकार्य दिलेल्या नागरिक बंधू-भगिनींचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. ज्यांना यावर्षी पुरस्कार मिळू शकले नाहीत त्यांनी आपले प्रयत्न पुरस्कार मिळेपर्यंत आणि मिळाल्यानंतरही सुरु ठेवावेत. स्वच्छतेचा ध्यास अभियानापूरता मर्यादित न ठेवता जीवनध्येय मानून वागलं पाहिजे. गाव, शहरांच्या स्वच्छतेबरोबरंच नद्या, ओढे, झरे, विहिरींसारख्या जलस्त्रोतांच्या स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण केली पाहिजे. त्यादृष्टीनं आपण सर्वांनी मिळून काम करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यानी केलं आहे.