T20 WC 2024 सोबत पाकिस्तान संघ वर्ल्ड कप 2026 मधूनही बाहेर? वाचा सविस्तर

यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 WC 2024) पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खूपच वाईट ठरला आहे. पाक संघ आता विश्वचषकातून बाहेर पडला आहे. 14 जून रोजी विश्वचषक स्पर्धेत अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार होता पण पावसामुळे सामना रद्द झाला आणि दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाले. यासह पाकिस्तानचा संघ सुपर-8 च्या  (T20 WC 2024)शर्यतीतून बाहेर पडला आहे.

आता मोठा प्रश्न आहे की पाकिस्तानचा संघ 2026 चा टी-20 विश्वचषक  खेळू शकेल का? सर्व सुपर-8 संघ आणि यजमान देश टी-20 विश्वचषक 2026 मध्ये स्थान मिळवतील. यानंतर टी-20 रँकिंगच्या आधारे पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये स्थान मिळू शकते. पण ते कसे शक्य आहे? जाणून घेऊया..

टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आयसीसीनुसार, 2026 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये दोन यजमान संघ आपोआप प्रवेश मिळवतील. तसेच टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 चे संघ (भारत वगळता, इतर सात), याशिवाय तीन संघ जे 30 जून 2024 पर्यंत आयसीसी टी20I क्रमवारीत अव्वल स्थानावर असतील; ते 2026 च्या टी20 विश्वचषकात प्रवेश करतील. अशा प्रकारे 12 संघ पोहोचतील. उर्वरित 8 संघ आयसीसीच्या विभागीय पात्रता फेरीद्वारे निश्चित केले जातील.

आतापर्यंत टी20 विश्वचषक 2026 साठी भारत, श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरले आहेत. चालू हंगामाच्या साखळी फेरीअखेर सुपर आठमध्ये जाणारे उर्वरित दोन संघही पुढील हंगामाचे थेट तिकीट मिळवतील. मग शिल्लक राहिलेले 3 संघ 30 जूननंतर आयसीसीच्या टी20 क्रमवारीवरुन निश्चित होतील. सध्या क्रमवारीतील टॉप-7 मधील भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने सुपर आठ फेरी गाठत पुढील हंगामात थेट प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे या संघांना वगळता पहिल्या 3 स्थानावर येणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तानचा समावेश असू शकतो. पाकिस्तानचा संघ क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे, जो नंतर (पात्र ठरलेल्या संघांना वगळून) तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. शिवाय इंग्लंड (सध्या चौथ्या स्थानी, नंतर पहिल्या स्थानी) आणि न्यूझीलंडचाही (सध्या सहाव्या स्थानी नंतर दुसऱ्या स्थानी) मार्ग मोकळा होऊ शकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप