दारूबंदीसाठी 3 महिन्यापासून महिला झिजवत आहेत शासकीय कार्यालयांचे उंबरठे

बुलढाणा : नांदुरा तालुक्यातील दादगाव या गावांमध्ये अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे, आणि त्यामुळे गावात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर लहान मुले देखील आता दारूच्या आहारी जात आहेत, त्यामुळे गावात दारूबंदीसाठी याच गावातील महिलांनी लढा उभारला असून त्यांनी पोलीस स्टेशन ठाणेदार ते गृहमंत्र्यांपर्यंत दारूबंदीच्या संदर्भात निवेदन दिले आहे. मात्र अजूनही कारवाई होत नसल्याने ह्या महिला आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पामध्ये बाधित झालेले दादगाव, या गावची लोकसंख्या जेमतेम एक हजाराच्या आसपास आहे, जिगाव प्रकल्प मुळे पुनर्वसन झाल्याने येथील नागरिकांना लाखो रुपये मिळाले खरे, मात्र येथील नागरिक मिळालेला हा पैसा पूर्ण दारूच्या पाण्यात गमावत असल्याच्या तक्रारी महिला करत आहेत. सोबतच दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, घरामध्ये वाद सुरु झालेत, महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे. लहान मुले दारूच्या व्यसनाधिन होत आहेत.

त्यामुळे या गावातील महिलांनी गेल्या तीन महिन्यापासून जलंब पोलिस स्टेशनचे ठाणेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी, जिल्हाधिकारी आणि गृहमंत्र्यांपर्यंत निवेदनाद्वारे गावातील अवैधरीत्या विकली जात असलेली देशी विदेशी दारू, गावठी दारूचे अड्डे बंद करण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, अजूनही कुठलीच कारवाई होत नसल्याने या महिलांनी आज पुन्हा एकदा सर्वच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे आणि तात्काळ दारूबंदी न झाल्यास आता या महिला आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

त्यामुळे पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाने त्याची तात्काळ दखल घेऊन दादगाव मध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री थांबवावी आणि त्या माध्यमातून सुरू असलेल्या गावातील महिलांचे मानसिक छळ देखील थांबवावा अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.

हे ही पहा: