उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, परमहंस आचार्य यांची घोषणा

Udhayanidhi Sanatana Remarks:  INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.उदयनिधीने शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.’ असं वक्तव्य करत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर परमहंस आचार्य म्हणाले की, आज मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, द्रमुक नेते उदयनिधी यांचे शीर आणणाऱ्याला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन. जर कोणी त्यांचे डोके आणले नाही तर मी स्वतः त्यांचा शिरच्छेद करेन. मी तलवार तयार केली आहे. मी स्वतः जाऊन त्याचा शिरच्छेद करणार आहे. याचबरोबर, सनातन धर्म हा मानवतावादी, अहिंसा आहे, हे उदयनिधी यांना माहीत आहे. होय आम्ही मानवतावादी आहोत, परंतु आम्ही राक्षसांना देखील मारतो. उदयनिधी राक्षस बनले आहेत, असेही परमहंस आचार्य यांनी सांगितले.