अनिल परब,उदय सामंत यांचा राजीनामा घ्या; शिवसेनेच्या बैठकीत मागणी                                                                      

रत्नागिरी  – सत्ता असून देखील शिवसेनेतील धुसफूस नेहमीच चव्हाट्यावर येत असते. अशीच एक घटना काल घडली.  चिपळूण शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी चिपळूण येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत(Guardian Minister Anil Parab and Higher and Technical Education Minister Uday Samant)  यांच्या बद्दल थेट नाराजी व्यक्त करत शिवसैनिकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

या बैठकीत पालकमंत्री बदला आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. उत्तर रत्नागिरी भागातील दापोली, खेड, मंडणगड, गुहागर या पाच तालुक्यातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बदलाच्या मागणीला बैठकीत जोर धरला होता. या भागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपली खदखद पक्ष नेतृत्वासमोर मांडली त्यामुळे शिवसेनेत खळबळ माजली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे 29 मे दरम्यान शिव संपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग(Ratnagiri, Sindhudurg)  जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीमध्ये  बहादूर शेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह खेड दापोली मंडणगड गुहागर तालुक्याचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड, गुहागर खेड दापोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.