लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज यांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं, 2019ची विधानसभा निवडणूक आठवा. भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खासकरून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षं ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये बोलला नाहीत.मुख्यमंत्री फडणवीस होतील असं पंतप्रधान बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकतंय, तेव्हा अडीच वर्षांची टूम काढली. एकांतात बोलले होते, मग बाहेर का नाही बोलले? जी गोष्ट सगळ्या लोकांसमोर येणार आहे ती चार भिंतीत का केलीत.

एक दिवस सकाळी उठून पाहिलं तर जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले. लग्न कोणासोबत? तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार? असा सवालही त्यांनी विचारला आहे.