प्रभाकर साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.

मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.

दरम्यान, एका बाजूला प्रभाकर साईल यांचे निधन झाले असताना आता दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले असून यात ते म्हणतात, मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.