‘पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी ही गंभीर बाब, केंद्र आणि राज्य सरकारांनी राजकारण करण्याऐवजी जबाबदारी निश्चित करावी’

नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी पंजाब दौऱ्यामध्ये आढळलेल्या सुरक्षेतील त्रुटींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. तर, दुसरीकडे चरणजित सिंग सरकार याप्रकरणी कारवाई करत आहे. पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. यासोबतच उद्या सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा काल सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी या प्रकरणी सरन्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला. न्यायालयाने याचिकेची प्रत पंजाब सरकारला देण्यास सांगितले. आता त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान अधिकृत दौऱ्यावर असो किंवा पक्षाच्या प्रचारासाठी असो, ते भारतीय प्रजासत्ताकचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या सुरक्षेतील त्रुटी ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा चुकांमुळे आपण यापूर्वी प्रत्येकी दोन पंतप्रधान गमावले आहेत. केंद्रीय आणि राज्य सरकारांनी याचे राजकारण करण्याऐवजी जबाबदारी निश्चित करावी असं त्यांनी म्हटले आहे.