धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, ३० लाखांची खंडणी मागितली

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणारी बातमी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथून आली आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांना चक्क जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महेश लांडगे यांच्याकडे ३० लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सविस्तर तपासणी करत आहेत. अद्याप धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव समजलेले नाही.

आमदार महेश लांडगे यांना त्यांच्या परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअपच्या माध्यमातून ही धमकी मिळाली आहे. अज्ञात मोबाईल क्रमांकावरून ३० लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल देखील देण्यात आली आहे. संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच इतर रक्कम ही एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरीक आपली समस्या आमदारांपर्यंत पोहोचवतात. नागरीक संबंधित हेल्पलाईन नंबरवर व्हाट्सअॅपवर आपली तक्रार पाठवतात किंवा मदत मागतात. त्यानंतर महेश लांडगे यांची टीम आणि कार्यकर्ते नागरिकांच्या कामासाठी धावून जातात. पण याच हेल्पलाईन नंबरवर खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.