पुण्यातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू

Pune Crime : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरी आलेल्या २६ वर्षीय तरुणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आढळल्याने परिसरात खळबळ माजली. दर्शना दत्तू पवार असे या तरुणीचे नाव आहे. दर्शना गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होती. ती हरवल्याची तक्रार नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. दर्शनासोबत तिचा मित्रही बेपत्ता असल्याचे समजतेय.

स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून (एमपीएससी) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) पोस्ट काढलेल्या 26 वर्षीय तरुणीचा राजगड किल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुळची कोपरगावची दर्शना सत्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आली होती. नर्हे येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी ती मित्रासोबत ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पाना दिली होती. तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती. मात्र पुढे फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता असल्याबाबत समोर आले. त्याच्या कुटूंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत मिसिंग दाखल केली.

त्यानंतर आता राजगड किल्ल्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. तिचा मोबाईल इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. यादरम्यान, प्राण्यांनी मृतदेहाशी छेडछाड केलेली असल्याचेही समोर आले. तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.