शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाली पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी – शिंदे

मुंबई – एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिवसेनेत प्रवेश सुरू आहेत. यातच आता विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, हा प्रवेश होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली. या निमित्ताने शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त करतो. असं शिंदे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला आमदार कायंदे म्हणाल्या, एकनाथ शिंदे हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा काम करण्याचा स्वभाव आहे. मलाही जनतेचं काम करायचं आहे. ते करता यावं यासाठी योग्य व्यासपीठ हवं होतं, ते आता मिळालं आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर त्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.