‘मनिषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या, काही कळत नाही; त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या’

मुंबई – एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

मनिषा कायंदे यांनी काल ठाकरे गटाला राम राम करत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. “मनिषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या, काही कळत नाही. त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या. उद्धव ठाकरेसोबत (Uddhav Thackeray) राहतील असं वाटतं होतं. पण त्या शिंदेंसोबत गेल्या. त्यांनी हा निर्णय कसा घेतला कळत नाही”, असं म्हणत माजी शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कायंदेंच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ हे देखील एकेकाळी कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी देखील त्या काळातील परीस्थिती पाहून शिवसेनेची साथ सोडली होती. अनेकांना भुजबळ हे बाळासाहेबांची साथ सोडतील असं वाटले नव्हते आता त्यांनाच  कायंदे यांच्या जाण्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण काय असा देखील सवाल उपस्थित केला जाऊ शकतो.