Pune News | साहित्य, कला, भक्ती, वारकरी पंथाची सेवा हाच खरा भावार्थ : डॉ. गो. बं. देगलूरकर

Pune News : डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम लेखक, साहित्यिक, कलावंत तसेच वारकरी होते. त्यांच्या नावे कार्यक्षम, विचारवंत, बुद्धिमान व्यक्तींना पुरस्कार दिला जात आहे ही गौरवाची बाब आहे. साहित्य, कला, भक्ती, वारकरी पंथाची सेवा हाच खरा भावार्थ आहे, असे प्रतिपादन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.

सनातन धर्म अंनतकाळापासून चालत आलेला असून अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. सनातन धर्म नित्यनूतन, प्रवाही आहे. आपण सर्वजण सनातनधर्मी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे, असेही डॉ. देगलूरकर यांनी सूचित केले.
संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे ‌‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024′ पुरस्कारांचे वितरण आज, रविवारी करण्यात आले. ‌‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024, कीर्तनसेवा पुरस्कार’ ह. भ. प. अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांना तर ‌‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कर 2024, लोककला सेवा पुरस्कार’ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य हेमंतराजे मावळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ. देगलूरकर बोलत होते. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष असून 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील (Pune News) लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. पांडुरंगाची मूर्ती ही योगस्थानक आहे. वारकरी पंथातील आद्यगुरू ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याला योगीराज असे संबोधले आहे. म्हणूनच त्यांच्या समोर गेल्यानंतर प्रत्येकाचे भान हरपून जाते व कुठल्याही प्रकारचे मागणे मागितले जात नाही. कारण या मागण्यालाही मर्यादा असते, असे डॉ. देगलूरकर म्हणाले.

आळंदी देवाची येथील वेदांत सत्संग समितीचे गुरुवर्य डॉ.  नारायण महाराज जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजननाथ, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मकरंद टिल्लू तसेच डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे व्यासपीठावर होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. नारायण महाराज जाधव म्हणाले, डॉ. देखणे यांनी आपल्याला वेदांतांचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले व सात्विक धैर्य दिले. त्यांच्या नावे दिलेल्या पुरस्काराने आध्यात्माचे जतन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुरस्काराला उत्तर देताना ह. भ. प. अमृताश्रम स्वामी महाराज म्हणाले, डॉ. देखणे हे पारमार्थिक जीवनाचे पथदर्शक होते. त्यांच्या नावे मिळालेला पुरस्कार हा मी प्रत्यक्ष नारायणाचा प्रसाद म्हणून स्वीकारतो. व्यक्ती आपल्यातून गेली तरी त्याची कीर्तीतनू, वैचारिक कास, पथ तसेच राहत असतात. सध्याच्या परिस्थितीत अस्थिर झेंड्यांना रोवणे आवश्यक असून त्याला संतविचारांचे खतपाणी घालणेही गरजेचे आहे. सध्याच्या काळात कीर्तन-प्रवचनांना होणारी गर्दी वाढली आहे, परंतु त्यातील दर्दींची संख्या कमी झाली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आचार्य मावळे म्हणाले, वारकरी कुटुंबात जन्म झाल्याचे आज सार्थक झाले. डॉ. देखणे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार म्हणजे शारदेच्या दारात शाहिराला मिळालेले स्थान आहे. कीर्तन व शाहिरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज मिळालेल्या गौरवाच्या रक्कमेत भर घालून पुरस्काराची रक्कम शाहिरी कला प्रकार जीवंत राहण्यासाठी स्थापन केलेल्या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीस देणगी म्हणून देत आहे.

प्रास्ताविकात डॉ. भावार्थ देखणे यांनी पुरस्कारामागील भावना विशद केली. डॉ. भावार्थ देखणे यांनी लिहिलेल्या डॉ. रामचंद्र देखणे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणाऱ्या लेखाचे तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मानपत्राचे वाचन डॉ. पूजा देखणे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार डॉ. भावार्थ देखणे, कमरंद टिल्लू, संदिप लचके यांनी केला.

सुरुवयातीस डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक व अभिनेते अवधूत गांधी व सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सांप्रदायिक पंचपदी व अभंगाने तसेच अक्षता इनामदार यांच्या पोवाडा गायनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले तर आभार पद्मश्री जोशी यांनी मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !