आर अश्विन – यशस्वी जयस्वाल जोडीचा धमाका, टीम इंडियाचा विंडिजवर तिसऱ्याच दिवशी विजय

WI vs IND 1st Test – वेस्ट इंडिजविरुद्ध डोमिनिका इथं झालेला पहिला क्रिकेट कसोटी सामना भारतानं (India) एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आहे. आपला पहिला डाव 5 गडी बाद 421 धावांवर घोषित केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला दुसऱ्या डावात 130 धावांमध्येच गुंडाळलं आणि सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजय संपादन केला.

भारताच्या पहिल्या डावात, कसोटीत पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) 171 आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारतानं सामन्यावर पकड मिळवली होती. यशस्वी जयस्वाल सामनावीर ठरला. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अश्विनने (R Ashwin) या सामन्यात सलग दुसऱ्यांदा आणि एकूण 34 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच एकाच सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची अश्विनची आठवी वेळ ठरली. अश्विनने यासह माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या विक्रमाची बरोबरी केली.