राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; महाविकास आघाडीची होणार पुन्हा धुलाई ?

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले होते. या भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात जाहीर सभा घेणार (Raj Thackeray rally in Thane) आहेत.

मागील भाषणात राज ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच मशिदीवर भोंगे असतील तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल म्हटलं. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मनसे म्हणजे भाजपची बी टीम असल्याची टीकाही झाली. दरम्यान ठाकरे यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांची तोफ ठाण्यात धडाडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी राज ठाकरेंची ठाण्यात सभा होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन परिसरात ही सभा होणार आहे. यासाठी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सभेची परवानगी आणि इतर तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, ठाण्यातील सभेतून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.