राज ठाकरेंनी प्रथम त्यांची सभा भोंगे, स्पीकर शिवाय करावी – राष्ट्रवादी

पुणे – महाराष्ट्र दिनी ( Maharashtra Day ) म्हणजेच येत्या १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांच्या औरंगाबादमधील ( Aurangabad ) प्रस्तावित सभेला गुरुवारी परवानगी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परवानगीवरून बरीच चर्चा सुरू होती. विशेषत: मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. यासंदर्भात मनसेकडून परवानगी मिळणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर ती परवानगी गुरुवारी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून एक लक्ष्यवेधी मागणी करण्यात आली आहे.  जर भोंगे, स्पीकर मुळे राज ठाकरे यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकर शिवाय सभा करावी. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जिम्मेदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( Nationalist Congress Party ), अल्पसंख्यक विभाग ( Minority section ), प्रदेश संघटक सचीव हलिमा शेख ( State Organizing Secretary Halima Sheikh ) यांनी केले.

औरंगाबाद येथील मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसांनी  सशर्त परवानगी दिली असली तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी जर सभेत किंवा सभेनंतर अनुचित प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग राज्यभर निषेधार्थ तीव्र मोर्चा काढेल असा इशारा देऊन हलिमा शेख यांनी जनतेला सभेला जाऊ नये असे आवाहन देखील केले.