‘उद्धवजी…. आपलं घर आपल्यालाच सांभाळता आलं नाही मग दुसर्‍याच्या नावाने कोल्हेकुई का?’

बीड – शिवसेनेचं राजकारण वर्तमानकाळावर चालतं. ज्याचा ढोल त्याची ढोलकी वाजवणारी सेना म्हणजे शिवसेना. जनादेश ठोकारला अन् मुख्यमंत्री पदासाठी भाजपची (BJP) साथ सोडली, स्वार्थासाठी  हिंदुत्व (Hinduism) वेशीला टांगलं आणि अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या नावाखाली राज्य केलं. भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करणार्‍यांनी 22 वर्षे संसार कसा सोबत केला? आपलं घर आपल्यालाच सांभाळता आलं नाही मग दुसर्‍याच्या नावाने कोल्हेकुई का? 100 कोटीचे कमिशन घेणारे मंत्री सेना सत्तेच्या काळात जेलमध्ये गेले. कोण कुणाला मलिदा देत होतं? हे पोलीस यंत्रणेपासुन न्याय देवतेपर्यंत लोकांना सत्य समजले. राजकिय फायद्यासाठी मताचं लांगुनचालन करताना स्व.बाळासाहेब ठाकरेंचे तत्व आणि विचार बाशनात गुंडाळले. खरं तर शिवतीर्थावर कुणी गट पाडले? याचं आत्मपरीक्षण शिवसेना (Shiv Sena) नेत्यांनी करायला हवं. आज कमळाबाई म्हणत भाजपाला हिणवणार्‍यांनी याच कमळासोबत 22 वर्षे संसार करताना एक चिकार शब्द काढला नाही हे आश्चर्य म्हणावं.असं भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले,  राजकिय संकटात शिवसेना नेहमीच मुखपत्राचा आधार घेत त्यातुन आपली विचार आणि तत्वाचा बाजार मांडतात हे सर्वश्रुत आहे. खरे संपादक प्रत्यक्ष टेबलवर नसले तरी भाजपला लक्ष्य ठरवुन होणारं लिखाण अंतर्मुख त्यांनाच करायला लावणारं आहे. मुळात शिवसेना कुणी फोडली? कुणाला वैतागुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट बाहेर पडला? राज्य अस्थिर कुणी केलं? आपल्याला आपलेच लोक सांभाळता न येण्याचे कारण काय? या सार्‍या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेला वेगळ्या सांगण्याची गरज नाही. भाजप झोडा, फोडा असं राजकारण कधीच करत नाही. आपल्या कामातुन लोकांची मने जिंकणं आणि सर्वांना सोबत घेवुन राजकारण करणं हा मुळ भाजपाचा अजिंडा त्याहुन अधिक हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जन्म घेतला आम्ही ही खर्‍या अर्थाने भुमिका भाजपाची आहे.

वासे फिरले की घर फिरतं. चाळीसपेक्षा अधिक आमदार, खासदार बाहेर पडले. एवढी मोठी उभी फुट देशातल्या प्रादेशित पक्षात कधीच घडली नसावी. एखादा अपवाद असु शकतो. याचं आत्मचिंतन खर्‍या अर्थाने करणे गरजेचं वाटतं. 22 वर्षे भाजपसोबत संसार करताना भाजपाच्या राजकिय नितीवर, तत्वावर, विचारावर कधीच आक्षेप घेतला नाही. आता मात्र डोमकावळ्यासारखं माध्यमाद्वारे सुरू असलेलं बोलणं पण त्या मागचं सत्य लोकांना पटलं असल्याने आता सामनाही कुजुन गेल्यासारखं वाटतं. अडीच वर्षे सत्ता चालवताना राजकिय स्वार्थापोटी स्वाभिमान बाजुला ठेवला. हिंदुत्व वेशीला टांगलं. वैचारिक भुमिका चौपाटीवरच्या समुद्रात फेकुन दिली.

एवढंच नाही तर ठाकरे कुटुंबियाना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सर्वोच्च वाटली ज्यांनी बारामती गाठुन सत्ता वाटुन घेतली. पण कारभार करताना स्व. बाळासाहेब ठाकरे अगदी स्वर्गातुनसुद्धा पहाताना त्यांच्या डोळ्यात आश्रु आले असतील. शिवसेना फुटल्यानंतर अर्थात महाविकास आघाडीचं (MVA) सरकार कोसळलं. त्याचबरोबर स्थिर सरकार देण्यासाठी आणि राज्याला विकासाच्या दृष्टीने घेवुन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाला पाठिंबा दिला आणि सरकार सत्तेवर आलं. सद्यस्थितीत शिल्लक शिवसेना रोज मातोश्रीवर राहिलेला पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत असली तरीही भाजपाचा काही संबंध नसताना त्यांच्या नावाने काव काव करताना दिसते. अर्थात उद्या येवु घातलेला दसरा मेळावा त्यातही शिवतीर्थावर कुणाचा होणार? यावरून रणकंदन पेटलं आहे. कायद्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे गटाची सुरू असलेली वाटचाल मुळ शिवसेनेच्या विचाराला धरून असल्याने प्रत्येक भुमिकेवर त्यांना मिळत असलेलं यश कमी नाही. उद्या कदाचित शिंदे गटाला शिवतीर्थावर परवानगी सुद्धा मिळु शकते. पण हा खरं तर फुटीर शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे त्यात भाजपाचा काय संबंध पण उतावीळ लेखनीला बुडत्याक्षणी केवळ भाजपचं शत्रु वाटतो.

कमळाबाई म्हणत हिणवणं पण मागे पहाताना 22 वर्षे संसार करताना काहीच कसं वाटलं नाही हे तितकेच महत्वाचे. आम्ही हिंदुत्व रक्षणकर्ते या आविर्भावात आज शिल्लक राहिलेली शिवसेना बोलत असली तरी अडीच वर्षात हनुमान चालिसासुद्धा (Hanuman Chalisa) वाचणार्‍याला तुम्ही जेलमध्ये घातलं. काय काय केलं? जनाब, एवढेच नाही तर अनेक गोष्टी पुढे आल्या तेव्हा मग हिंदुत्व रक्षणाची भाषा कुठे गेली होती? अनेक वर्षापासुन मुंबई लुटण्याचं काम यांनी केलं. पण आता सर्वसामान्य जनता काही केल्या शिवसेनेच्या हाती सत्ता देणार नाही. या भुमिकेत असल्याने खरंच अंगी बिथरल्यासारखी मुंबईत शिवसेना वागत आहे. भाजप मराठी माणसासोबतच हिंदुत्वाचं खंबीरपणे रक्षण करतो हे वर्तमानकाळात हिंदु सण मोठ्या उत्सवाने साजरे होवु लागले. त्याचीच प्रचिती म्हणावी लागेल. असं राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.