आमचे राजकारण फक्त समाजकारण आणि जनसेवेसाठी – यशोमती ठाकूर

अमरावती – राजकारणासाठी राजकारण, हे आमच्या स्वभावात नाही; आमचे राजकारण केवळ समाजकारणासाठी आणि जनसेवेसाठीच! असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर(Yashomati Thakur)  यांनी आज अमरावतीमध्ये ठामपणे सांगितले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने मोझरी येथे स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीवर्षानिमित्त १४०० दिव्यांगाना अमरावतीत साहित्य वाटप कार्यक्रम आज मोझरी येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीवर्षानिमित्त दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या (ए.डी.आय.पी.) योजनेनंतर्गत श्री. रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम मोझरी येथील  रावसाहेब ठाकूर विद्यानिकेतन प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व साहित्य साधने, मोटाराईज्ड ट्रायसिकल, तिनचाकी साईकल, व्हिल चेअर, कुबडी जोडी, स्मार्ट फोन, स्मार्टकेण, एमआर किट, ब्रेल किट, सिटी चेअर, आटोबाईक जयपूर फुट, कैलिफर इत्यादी साहित्य १४०० दिव्यांगाना अमरावतीत सुमारे २ कोटी रुपयांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

ही भूमी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची कर्म भूमी आहे, त्यांच्या संतवचनातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनीही आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिले आहे. आपला जन्म देशसेवेसाठी झाला आहे, असे मनावर बिंबवले आहे. म्हणूनच राजकारणापलीकडे जाणून जनतेच्या हिताचे समाजकारण करण्यात आम्ही नेहमीच अग्रेसर असतो. रामचंद्र युवक कल्याण संस्थेने आपल्या समाजोपयोगी कार्यातून आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे यांचा अभिमान वाटतो. असे ही अॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. याकार्यक्रमास रामचंद्र युवक कल्याण संस्थेचे पदाधिकारी आणि अमरावती जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.