मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे; रामदास कदम यांनी मांडल्या व्यथा

मुंबई – माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. २०१९ पासून पक्षाकडून बाजूला सारल्या गेलेल्या रामदास कदम यांनी राजीनामा देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफच डागली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र माझं म्हणणं मांडण्यासाठी मला मीडियासमोर कधीच जाऊ दिलं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा योगेश कदम आमदार याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतलं आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोललं किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटं आली, त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे,असं कदम यांनी म्हटलं आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात, त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करू नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचंही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे, असं सांगत रामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे.