चौफेर टीका होऊनही राज्यपालांचा हेका कायम, आता म्हणाले…

मुंबई : राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुंबई-ठाण्यातून (Mumbai-Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

दरम्यान,आता चौफेर टीका होऊ लागल्यानंतर राज्यपालांनी सारवासारव केली आहे. ते म्हणाले, मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो.

कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. असं ते म्हणाले आहेत.